तरुण भारत लाईव्ह । ४ एप्रिल २०२३। उन्हाळा सुरू झाला आहे. आणि उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी अनेक उपाय अवलंबले जात आहेत. सरबत पिणे, माठातील गारेगार पाणी घेणे असे काही प्रकार करायला सुरुवात झालीच असेल. पण त्याहीपेक्षा एक चांगला उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि उपाय अगदी घरगुती आहे. गुलकंद हा अत्यंत चविष्ट असतो. तो चविष्ट असण्यासोबतच आरोग्यदायी देखील असतो. हा गुलकंद घरच्याघरी देखील तयार करता येतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही फारच सुंदर आणि मोठ्या प्रमाणात हा गुलकंद तयार करू शकता. गुलाबाच्या ताज्या पाकळ्यांनी गुलकंद घरी कसा बनवायचा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
दोन कप ताज्या गुलाबाच्या पाकळ्या, १ कप साखर, पाव टीस्पून बडीशेप पावडर, अर्धा टीस्पून वेलची पावडर.एका मोठ्या काचेच्या भांड्यात तळाशी गुलाबाच्या पाकळ्या ठेवा. त्यावर थोडी साखर पेरा. त्यावर पुन्हा एकदा गुलाबाच्या पाकळ्यांचा थर टाका. पुन्हा त्यावर साखर पेरा. त्यावर वेलची आणि बडीशेप पावडर घाला. त्यानंतर जर काही गुलाबाच्या पाकळ्या उरल्या असतील तर त्या त्यावर घाला आणि साखरही घाला. आता झाकण बंद करा आणि बरणी ८-१० दिवस उन्हात ठेवा. मध्यंतरीच्या काळात चमच्याने एकदोनदा मिश्रण ढवळून घ्या. संपूर्ण मिश्रण एकजीव झाले की हा चवदार गुलकंद जेवणात वापरा.
गुलकंदाचे फायदे
१. शरीरातील उष्णता वाढल्यावर गुलकंदचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेच्या त्रासांपासून आराम मिळतो. २. तोंडात फोड आले असतील तर तसेच त्वचेच्या समस्यांवरही गुलकंद अत्यंत फायदेशीर आहे. थकवा किंवा शरीरात उर्जेची कमतरता असल्यास गुलकंद उपयोगी असतो.
३. गरोदरपणात गुलकंद फायदेशीर आहे. गुलकंद रोज खाण्याने पोटाचे त्रास दूर होतात. भूक वाढवण्यासाठी तसेच पचनसंस्थेचे नियमन करून अपचनाची समस्या दूर करते.
४. सतत कॉम्प्युटरच्या वापराने डोळ्यांत जळजळ होते. त्यावर गुलकंद अत्यंत उत्तम औषध आहे. डोळ्यांची दृष्टी वाढविण्याचे आणि थंडपणा देण्याचे काम गुलकंद करतो.
५. गुलकंदचे नियमित सेवन मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे. सकाळ संध्याकाळ एक चमचा गुलकंद खाल्ल्याने मन ताजेतवाने होते.