कोल्हापूरसह सांगली, साताऱ्याला भूकंपाचे धक्के

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. येथून भूकंपाचे केंद्र साताऱ्यातील कोयना धरणापासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी ६.४५ वाजता कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात ३.४ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

हे धक्के कोयना धरणापासून २० किमी अंतरावर जाणवले असल्याने धरण क्षेत्राला कोणतीही बाधा न झाल्याची माहिती समोर आली आहे. कोयना धरण सुरक्षित आहे. सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यापासून १५ किलोमीटरवर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून ५ किमी खाली होता.

गेल्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. २९ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवले आणि जमीनही हादरली होती.