---Advertisement---
Mamurabad Call Center Case : प्रसिद्ध कंपन्यांचे एजंट असल्याचे भासवून परदेशी नागरिकांना लाखोंचा गंडा घालणान्या एका आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. ममुराबाद रस्त्याला असलेल्या फार्महाऊसवर बसून परदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून त्यांच्या खात्यातील पैशांतून सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी खरेदी करायची, त्यानंतर त्याचे रूपांतर करून ती हवालामार्गे भारतात आणली जायची, अशा पद्धतीने हे रॅकेट सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण केवळ भारतापुरते मर्यादित नसून, हे प्रकरण आंतराष्ट्रीय स्तरावरचे असून, या कारवाईबाबत दिल्लीहूनच सूचना आल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी इगतपुरी व नाशिक जिल्ह्यांतील काही ठिकाणी अशाच प्रकारचे बनावट कॉलसेंटरवर कारवाई सीबीआयच्या पथकाकडून करण्यात आली होती.
अमेरिका व कॅनडामधून पैसा भारतात
अमेझॉनच्या गाहकांचा डेटा घेऊन कॉल केले जात होते. अमेरिका, कॅनडामधून फसवणूक केल्यानंतर अॅमेझॉन आयडी कोणत्या बँकेशी लिंक आहे, हे समजत होते. त्यानंतर याच रॅकेटमधील काही सायबर गुन्हेगार तो पैसा क्रिप्टोकरन्सीद्वारे खरेदी करत होते. त्यानंतर हा पैसा मुंबई येथे हवालाद्वारे येत होता, अशी माहिती तपासात समोर आली.
आगारिया ब्रदर्स करायचे फार्म हाऊसवर रेकीचे काम
जळगावातील संपूर्ण काम सकेश आगारिया आणि त्याचा भाऊ नरेंद्र आगारिया यांच्याकडे होते. ते ममुराबाद फार्महाऊसचे रेकीचे काम करीत होते. तर, कॉलसेंटरमधील काम करणाऱ्यांकडून ऑनलाइन फसवणुकीच्या कामावर लक्ष दिले जात होते. हे आगारिया ब्रदर्स ललित कोल्हे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
लॅपटॉपमधून डेटा व माहिती काढणे सुरू
कोल्हे फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवरून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून माहिती संकलनाचे काम सुरू झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये काही प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे कॉल सेंटर काही महिन्यापासून एमआयडीसी भागात सुरू होते, मात्र काही वाद झाल्यानंतर ते ममुराबाद फार्म हाऊसवर आणण्यात आले. ९ सप्टेंबर पासून या ठिकाणी हे कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले, अशीही माहिती मिळाली. याप्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे व इतर संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
---Advertisement---