ब्रेकिंग ! धरणगावमध्ये लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : अवैधरीत्या वाळू वाहतूक करू देण्यासह वाहनांवर कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती 25 हजांराची लाच स्वीकारताना धरणगाव नायब तहसीलदारांसह कोतवालास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी तीन वाजता रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. जयवंत पुंडलिक भट (51, रा.काळकर गल्ली, एरंडोल) असे अटकेतील नायब तहसीलदाराचे तर राहुल नवल शिरोळे (30, रा.पाळधी) असे कोतवालाचे नाव आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध वाहतुकीला महसूल प्रशासनाचा छुपा आशीर्वाद असल्याचा आरोप होत असताना महसूलातील बड्या अधिकार्‍यावर कारवाई झाल्याने जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तडजोडीअंती स्वीकारली 25 हजारांची लाच
जळगावातील रायसोनी नगरातील 27 वर्षीय तक्रारदार यांच्या भावाचे नावे दोन डंपर असून ते वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. एक डंपर एरंडोल तहसीलमध्ये कारवाईदरम्यान जप्त करण्यात आले असून यापूर्वी एक डंपर पकडण्यात आल्यानंतर 1 मार्च रोजी 30 हजार व 11 मार्च 23 हजार रुपये जयवंत भट यांनी घेतले होते शिवाय एरंडोल तहसीलमधील जप्त डंपर सोडण्यासाठी तसेच दुसरे वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी कोतवालाच्या माध्यमातून 30 हजारांची लाच गुरुवारी मागितल्यानंतर तक्रारदाराने 25 हजार रुपयात तडजोड केली व कोतवालाने नायब तहसीलदार भट यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. सापळा रचल्यानंतर कोतवालाने पाळधी पोलीस दुरक्षेत्राच्या बाजुस असलेल्या रस्त्यावर 25 हजारांची लाच स्वीकारल्यानंतर त्यास अटक करण्यात आली तर तहसील कार्यालयातून नायब तहसीलदाराला अटक करीत त्यांच्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, पोलीस नाईक ईश्वर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चाटे, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.