KRK Arrest अभिनेता आणि समीक्षक कमाल राशिद खान उर्फ केआरके ला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. के.आर.के. अनेकदा बॉलिवूड चित्रपटांची विडंबनात्मक समीक्षा करत असतो. नुकताच त्याला विमानतळावर अटक केल्यानंतर त्याने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. चला तर जाणून घेऊया, नेमकं त्याने का भाईजानवर आरोप केले.
अभिनेता आणि समीक्षक के.आर.के.ला २०१६च्या एका प्रकरणामध्ये मुंबईत अटक करण्यात आली आहे. त्याने नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर ही बातमी शेअर केली. तो आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, “मी गेल्या वर्षभरापासून मुंबईत आहे. मी माझ्या सर्व न्यायालयीन तारखांना नेहमीच उपस्थित असतो. आज मी न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी दुबईला जाणार होतो. पण मुंबई पोलिसांनी मला विमानतळावर अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी २०१६च्या एका प्रकरणात वॉन्टेड आहे.”
के.आर.के.ने त्याच्या ट्वीटमध्ये पुढे म्हटलाय, “सलमान खान म्हणतोय की, त्याचा ‘टायगर ३’ हा चित्रपट माझ्यामुळे फ्लॉप झाला आहे. पोलिस ठाण्यामध्ये किंवा तुरुंगामध्ये जर माझा मृत्यू झाला तर तुम्हा सर्वांना कळायला हवं की तो खून आहे. आणि तुम्हाला त्याचा मास्टरमाईंड कोण आहे, हे माहित हवं.” असं तो आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.