IND vs ENG : कुलदीप यादव रोहित शर्मापेक्षा दोन पावले पुढे; म्हणाला ‘प्रयत्न नव्हे यश…’

IND vs ENG : टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. आता टीम इंडिया सेमी फायनलमध्ये २७ जूनला इंग्लंडशी भिडणार आहे. या सामन्याचा उत्साह शिगेला पोहचला असताना, रोहित आणि कुलदीप यादव यांच्या वक्तव्याने त्या उत्साहात आणखी भर पडली आहे.

रोहित शर्मा आणि कुलदीप यादव असे का म्हणाले ?
रोहितने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्य फेरीचे तिकीट बुक केल्यानंतर रोहित शर्माला जेव्हा विचारण्यात आले की, इंग्लंडविरुद्धच्या सामन्याबद्दल काय सांगाल ? तेव्हा इंग्लंडविरुद्धचा सामना चांगला होईल, असे त्याने बिनधास्तपणे सांगितले.

तसेच  इंग्लंडला समोर पाहून आमच्यात काहीही बदल होणार नाही. एक संघ म्हणून आम्ही जे काही करू शकतो आणि आत्तापर्यंत करत आलो आहोत ते करणे हे आमचे ध्येय असेल. आम्हाला सामना जिंकायचा आहे.

रोहित शर्माच्या या विधानानंतर उपांत्य फेरीचा उत्साह अजूनच वाढत असताना कुलदीप यादवच्या वक्तव्याने त्या उत्साहात आणखी भर पडली. कुलदीप तर रोहितच्या दोन पावले पुढे गेला. त्याने थेट टी-20 विश्वचषक जिंकण्याचे सांगितले. उपांत्य फेरीचा उल्लेखही केला नाही.

यावेळी कुलदीप म्हणाला की, आम्हाला प्रयत्न करायचे नसून यश मिळवायचे आहे. ट्रॉफी घरी आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे कुलदीप म्हणाला.