जनावरांची प्रयोगशाळा, जळगाव जिल्ह्याचा कौतूकास्पद उपक्रम

जळगाव : कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्यानंतर लहान शहरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा भक्कम करण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र हे झाले मनुष्यापुरता…जनावरांचे काय? असा प्रश्‍न पडणे स्वाभाविकच आहे. मात्र जळगाव जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या दृष्टीने कौतूकास्पद काम सुरु केले आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्यात जनावरांची प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत रक्तासह विविध चाचण्या करण्याच्या सोयी उपलब्ध झाल्याने जनावरांमधील आजारांचे २४ तासांतच निदान व्हायला लागले आहे.

यापूर्वी जनावरांमधील आजारांच्या निदानासाठी रक्तासह विविध नमुने नाशिक किंवा पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्याच्या अहवाल प्राप्तीसाठी आठवडाभराचा कालावधी लोटला जात होता. परिणामी उपचाराअभावी अनेक जनावरांचा मृत्यू होत होता. मात्र ही दिरंगाई टाळण्यासाठी पशूसंवर्धन विभागाने जिल्ह्यातच स्वत:ची सुसज्य अशी प्रयोगशाळा सुरु केली आहे.

अशा आहेत सुविधा
‘हिमॅटो नालायझर’ : या माध्यमातून रक्त चाचण्या केल्या जातात. हिमोग्लोबीनसह रक्तातील विविध घटकांचा अभ्यास या चाचणीतून होतो.
बायोकेमिकल नालायझर : या माध्यमातून यकृत व मूत्रपिंडांची तपासणी केली जाते.
अँटिबायोटिक सेन्सिटिव्ह टेस्ट : अँटिबायोटिक जास्त प्रमाणात वापरल्यामुळे झालेल्या दुष्परिणांना ओळखण्यासाठी ही चाचणी पूरक ठरते.
काचपट्टी चाचणी : रक्त नमुन्यांच्या अन्य चाचण्यांसाठी काचपट्टीची सुविधा आहे. परजीवींमुळे होणार्‍या आजारांचे तत्काळ निदान होते.