पाचोरा : विहिरीचे काम करताना विजेचा शॉक लागल्याने शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिघी येथे 18 रोजी घडली. घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कैलास युवराज पाटील (45) असे मयत शेतमजुराचे नाव आहे.
भडगाव शहरालगत असलेल्या भडगाव पेठमधील शेतमजूर कैलास युवराज पाटील (45) हा दिघी शेत शिवारातील विहिरीचे काम करीत होता. मंगळवार, 18 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विद्युत खांबाला मजबुती देण्यासाठी लावलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
यावेळी पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष यांनी ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेतली. महावितरणाच्या हलगर्जी पणामुळे झालेल्या मृत्यूने मयताचे कुटुंबीयास आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगीअसा परिवार आहे. घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महावितरणतर्फे तत्काळ मदत
मयताच्या कुटुंबास तत्काळ मदत म्हणून महावितरणचे कनिष्ठ अभियंता सागर यांचे हस्ते २०,०००/-चा धनादेश देण्यात आला.