---Advertisement---
पाचोरा : वाणी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा यांच्या वतीने करण्यात आला. हा कार्यक्रम व्यापारी भवनात पार पडला. या समारंभाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र चिंचोले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश्वर कोतकर, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रा. लक्ष्मण सिनकर, संदीप महालपुरे, विजय सोनजे, विवेक ब्राह्मणकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिवपदी निवड झालेल्या अनिल वाणी, उत्कृष्ट महसूल कर्मचारी पुरस्कार प्राप्त स्वप्निल येवले, जिल्हा भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्षपदी निवड झालेले रमेश वाणी, पाचोरा पिपल्स बँकेच्या आमंत्रित सदस्यपदी निवड झालेले अनिल येवले, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनोद महालपुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रमेश महालपुरे यांनी केले. युवामंचच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी ज्ञानेश्वर कोतकर यांनी माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्रा .राजेंद्र चिंचोले यांनी ज्ञान व नीती मूल्यांच्या जोरावर आदर्श समाज निर्मितीची जबाबदरी ज्ञानवंतावर असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज व राष्ट्राच्या विकासासाठी करावा अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. केवळ कागदावरचे गुण म्हणजे बुद्धिमत्ता हा समज काढून टाकावा. परंपरेने लाभलेल्या व्यावसायिक व कौशल्य उपजत गुणांचा समाजाच्या विकासासाठी वापर करावा .आपल्याला ज्यामध्ये आनंद वाटतो तेच क्षेत्र करिअरसाठी निवडावे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विविध शाखेमधील पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी तसेच दहावी ,बारावी परीक्षेतील गुणवंत ५१ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अशोक बागड व रमेश महालपुरे यांनी केले. यशस्वीतेसाठी महेंद्र महालपुरे, विशाल ब्राह्मणकर, किरण अमृतकर, प्रवीण शेंडे, संजय वाणी, गणेश सिनकर यांनी कामकाज पहिले. आभार विवेक ब्राह्मणकर यांनी मानले.









