श्रीहरीकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3 ) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उद्या (23 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. विक्रम लँडर सध्या चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा शोधत आहे. चंद्रावर ठिकठिकाणी खडकाळ आणि खड्डे असलेली जमीन आहे. त्यामुळे सॉफ्ट लँडिंगसाठी सपाट जमीन शोधण्याचा प्रयत्न विक्रम लँडर करत आहे. लँडिंगची प्रक्रिया ही चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. या मोहिमेचा हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. नेमकी ही प्रक्रिया कशी असेल? हे आता जाणून घेवूयात.
चांद्रयान-3 च्या लँडिंगची प्रक्रिया ही बुधवारी सायंकाळी 5:45 वाजता सुरू होईल. यानंतर रफ ब्रेकिंग फेज, अल्टिट्यूड होल्ड फेज, फाईन ब्रेकिंग फेज आणि टर्मिनल डिसेंट फेज या चार टप्प्यांमध्ये लँडिंगची प्रक्रिया पार पडेल. सुमारे 15 मिनिटांमध्ये हे चारही टप्पे पूर्ण केले जातील; आणि सायंकाळी 6:04 वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरलेलं असेल.
रफ ब्रेकिंग फेज
लँडिंग प्रक्रियेतील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेज असणार आहे. यामध्ये विक्रम लँडरचा वेग हा 1.68 किमी प्रति सेकंद यावरुन कमी करून 358 मीटर प्रति सेकंद एवढा करण्यात येईल. लँडरचा वेग कमी करण्यासाठी 400 न्यूटन क्षमतेचे चार इंजिन फायर करण्यात येतील. हा टप्पा 690 सेकंदात पार पडेल. यानंतर विक्रम लँडर हे चंद्रापासून अवघ्या 7.4 किलोमीटर उंचीवर असणार आहे.
अल्टिट्यूड होल्डिंग फेज
यानंतर दुसरा टप्पा सुरू केला जाईल. यामध्ये विक्रम लँडर हे चंद्रापासून 7.4 किलोमीटर उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 किमी उंचीवर नेण्यात येईल. हा टप्पा केवळ 10 सेकंदांचा असणार आहे.
फाईन ब्रेकिंग फेज
हा टप्पा अगदी महत्त्वाचा असणार आहे. या टप्प्यात विक्रम लँडर हे आणखी खाली नेऊन, चंद्राच्या पृष्ठभागापासून 800 मीटर उंचीवर पोहोचवण्यात येईल. 175 सेकंदांमध्ये हा टप्पा पार पडेल. ठराविक उंचीवर पोहोचल्यानंतर लँडरचा वेग शून्य करण्यात येईल. याठिकाणी हवेत राहून लँडरमधील सेन्सर चंद्रावर लेझर किरणे सोडेल. या किरणांच्या माध्यमातून लँडिंगच्या जागेची तपासणी करण्यात येईल. अनुकूल संकेत मिळताच, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 150 मीटर उंचीपर्यंत खाली नेण्यात येईल.
टर्मिनल डिसेंट
विक्रम लँडर हे 150 मीटर उंचीवर असताना लँडिंगची जागा निश्चित करण्यात येईल. याच उंचीवर राहून ते अनुकूल जागा ठरवेल. जागा फिक्स होताच टर्मिनल डिसेंट फेजला सुरुवात होईल. यामध्ये विक्रम लँडर हे आधी 60 मीटर आणि मग 10 मीटर उंचीपर्यंत खाली नेलं जाईल. यानंतर अगदी अलगदपणे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. यावेळी विक्रमचा वेग हा 1 ते 2 मीटर प्रतिसेकंद एवढा असणणार आहे.