---Advertisement---
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. गेल्या २४ तासांत नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पाचही मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढून तो सरासरी ९० टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, जिल्हाभरात १७ घरांची पडझड झाली असून, जीवित हानी झाली नाही. येत्या २४ तासांत पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. ४ व ५ सप्टेंबर रोजी हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यामुळे जिल्हाभरात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्यातील अनेक भागांतील रस्त्यांवर दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. जांगठी ते मणिबेली रस्त्यावरील कोसळलेली दरड हटविण्याचे काम हे पीएमजीएसवाय विभागाकडून सुरू आहे. उद्यापर्यंत ही दरड काढली जाणार आहे, तर तोरणमाळ घाटातील सातपायरी घाटात दरड कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ती हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय इतर काही भागांत दरडी कोसळल्या असून, त्या स्थानिकांनी हटविल्या असल्याचे सांगण्यात आले.
१७ घरांची पडझड
जिल्ह्यात सततच्या पावसामुळे १७ घरांची पडझड झाली आहे. यात अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक १० घरांची, तर नवापूर तालुक्यात ३, नंदुरबार, शहादा, तळोदा व धडगाव तालुक्यात प्रत्येकी एका घराची पडझड झाली. सुदैवाने कुणीही जखमी झाले नसल्याने जीवित हानी झाली नाही. याशिवाय अनेक ठिकाणी पाणी साचले असून, जनजीवनावर परिणाम झाला आहे. अनेक रस्त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.