लासलगाव रेल्वे अपघात :  पहिल्याच दिवशी लोकोपायलटसह गँगमनचे नोंदवले जवाब

भुसावळ  : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे रेल्वे लाईन दुरुस्त करणार्‍या टॉवरने धडक दिल्याने चौघा रेल्वे कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सहा वाजता घडली होती. या दुर्घटनेत संतोष भाऊराव केदारे (38), दिनेश सहादु दराडे (35), कृष्णा आत्मराम अहिरे (40) संतोष सुखदेव शिरसाठ (38) या कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी रेल रोको करण्यात आला तसेच रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेत रेल्वे लोकोपायलटसह तिघांचे निलंबन केले आहे. मंगळवारी मुंबई मुख्यालयातील तीन अधिकार्‍यांच्या चमूने अपघात प्रकरणाशी संबंधित तसेच रेल्वे गँगमन, स्टेशन मास्तर, लोकोपायलट आदींचे जवाब नोंदवले.

चुकीच्या दिशेने आलेल्या इंजिनाच्या धडकेने अपघात

लासलगाव ते उगाव दरम्यान ट्रॅक मेंटनन्सचे काम सुरू असताना किलोमीटर क्रमांक 230 जवळ रेल्वेचा पोल क्रमांक 15 ते 17 दरम्यान ब्लॉकची तयारी केली जात असताना लाईन दुरुस्त करणारे इंजिन (टॉवर) विरूद्ध दिशेने आल्यानंतर त्याने ट्रॅकवर काम करीत असलेल्या चौघा कर्मचार्‍यांना चिरडले तर सुदैवाने अन्य कर्मचारी बचावले. या घटनेनंतर संतप्त कर्मचार्‍यांनी रेल्वे चालक आर.एन.पाटील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना सुरक्षीतस्थळी नेले. अपघात प्रकरणी पाटील यांच्यासह कनिष्ठ अभियंता हेमंत ठाकूर यांच्यासह तिघांना रेल्वे प्रशासनाने निलंबीत केले आहे.

मुंबई मुख्यालयाकडून अपघाताची चौकशी

चार रेल्वे कर्मचार्‍यांच्या रेल्वे टॉवर वॅगनच्या धडकेने मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले होते. मंगळवारी मुंबई मुख्यालयातील डीआरएम दर्जाच्या सेप्टी, इलेक्ट्रीकल व सिव्हील इंजिनिअरींग विभागातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी लासलगाव येथे येवून अपघातस्थळाची पाहणी केली तसेच ट्रॅकमॅन, सुपरवायझर, लोकोपायलट, स्टेशन मॅनेजर आदींचे जवाब नोंदवले. आणखी दोन दिवस ही चौकशी चालणार असून त्यानंतर अहवाल रेल्वे सरव्यवस्थापकांना सादर करण्यात येणार असून त्यानंतर दोषींवर कारवाईची दिशा ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.