नवी दिल्ली : भारतात वारंवार दहशतवादी हल्ले करणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अकरम खान उर्फ अकरम गाझी असे या कमांडरचे नाव असून तो भारतात हल्ले करण्यासाठी २०१८ ते २०२० पर्यंत दहशतवाद्यांच्या भरतीचे काम पाहत होता. गाझीची गुरुवारी पाकिस्तानच्या बाजौरमध्ये हत्या करण्यात आली. अकरम हा लष्करच्या टॉपच्या कमांडरांपैकी एक होता.
यापूर्वी मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांनाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले आहे. रविवारीच जम्मू-काश्मीरमधील सुजवान येथे २०१८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड ख्वाजा शाहिदचे अपहरण करण्यात आले होते. त्याचा शिरच्छेद केलेला मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ सापडला.
गेल्या महिन्यात भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफ पाकिस्तानमध्ये ठार झाला होता. लतीफची सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 2016 मध्ये पठाण कोट एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा लतीफ मास्टरमाइंड होता. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतविरोधी कृत्यांमध्ये सहभागी होता.