जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामध्ये आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल (शुक्रवारी) पोलिसांनी लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. बीडमध्ये आंदोलकांकडून बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जालना, बीड, संभाजीनगरमध्ये तणावाची स्थिती आहे. शुक्रवारी धुळे-सोलापूर महामार्गावर १४ गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. जालन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. नंदूरबारमध्ये एका एसटी बसला जाळण्यात आल्याची घटना समोर आलीये. नंदुरबार आणि जालन्यामध्ये एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सोलापुरातही जाळपोळीची घटना घडली आहे. माहितीनुसार, आतापर्यंत ४५ पोलिस जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं उपोषण सुरु होतं. यावेळी कथितरीत्या पोलिसांवर गदडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जालना जिल्ह्यात जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत.
जालन्यातील घटनेचा सर्व स्तरातील नेत्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. उदयराजे भोसले यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला अशी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार प्रयत्नशील आहे. असे असतानाही एखाद्या व्यक्तीला उपोषणाला बसवून त्याच्या तब्येतीची चौकशीही न करणे हा गंभीर प्रकार आहे. त्या गावात पोलिसांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राजकीय पक्षांनी ‘बहती गंगा है हाथ धो लो’ असे करू नये. आरक्षणाची गरज नाही असे म्हणणारे ज्येष्ठ नेते वेगळेच बोलत आहेत. हा विषय राजकारणाचा नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…
आरक्षणाची मागणी रास्त, न्याय्य आहे. पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे.
छत्रपती संभाजी राजेंचा संताप
माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी जालन्यातील मराठा आंदोलनकाची भेट घेतली. यावेळी त्यांनी लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला. आंदोलकांवर तुम्ही गोळीबार कसाकाय करु शकता. मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर ती आधी छत्रपती संभाजीराजेवर घाला अशी उदिग्न प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. आज गरीब मराठ्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आंदोलनासाठी मी बाहेर पडलो आहे. मराठ्यांनी कायम शांततेने मोर्चे काढले आहेत. ५८ मोर्चे काढले पण कुठंही हिंसाचार झाला नाही. त्याची दखल जगाने सुद्धा घेतली. पण, कालच्या घटनेमध्ये लाठीचार्ज झाला, गोळ्या झाडल्या, अश्रू धुरकांड्या फोडल्या. कालचा प्रकार निंदनीय आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो, असं राजे म्हणाले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो.” “ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित.” असे ही राज ठाकरे म्हणाले.
पालकमंत्री अतुल सावे म्हणाले…
आम्ही मनोज जरांगे यांच्या संपर्कात होतो. मी स्वत: त्यांच्याशी बोललो, मुख्यमंत्र्यांशीही त्यांचे बोलणे करुन दिले. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. मनोजची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी घेऊन जाताना पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर लाठीचार्ज झाली. याप्रकरणी विशेष पोलिस महानिरिक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहे.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप
जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाचे आंदोलन मोडून काढण्यात पोलिसांनी बळाचा, बेछूट लाठीचा वापर केला आहे. याचा मी निषेध करतो. शांततेने आंदोलन सुरू असताना ते दडपण्यासाठी केलेली ही कृती कोणाच्या सांगण्यावरून केली गेली याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे.
खासदार संजय राऊत संतापले
मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना शिंदे-फडणवीसांच्या पोलिसांनी गुरा-ढोरासारखे झोडपले. पोलिसांनी लाठीमार कुणाच्या आदेशावरून केला. हेच का जनतेच्या हिताचे सरकार? सरकारच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही.