---Advertisement---
जळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ६० वर्षीय वकिलांची एक लाख १० हजार रुपयात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावलच्या पंचवटी भागातील गांधी चौक येथे राहणारे अॅड. राजेश प्रभाकर गडे (६०) यांच्याशी दि. २७ जुलै २०२५ रोजी अंकिता शर्मा असे नाव सांगणाऱ्या एका महिलेने संपर्क साधला. तिने ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत जास्त परतावा मिळेल, असे सांगून वकिलांना विश्वासात घेतले.
त्यानंतर सांगितलेल्या सूचनांनुसार अॅड. गडे यांनी एकूण १ लाख १० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर अनेक वेळा संपर्क साधला असता संबंधित महिला व तिचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दोघेही गायब झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अॅड. गडे यांनी यावल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून मुद्देमाल लंपास
नंदुरबार शहरातील नूतन कन्या हायस्कूलसमोरील जयहिंद इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी सकाळी समोर आली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानमालक नरेश लेखराज नानकाणी गुरुवारी सकाळी दुकानात आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजून आले. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकानात प्रवेश करून आतील २० हजार रुपये रोख, १० हजार रुपयांचे कॉइन, ६ हजार रुपयांचे चांदीचे कॉइन असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले होते.









