राज्यातील काँग्रेसचा मोठा नेता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महिन्याला एक खोका मिळतो असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला. याशिवाय मी माफी मागायला राहुल गांधी नाही असंही वक्तव्य केलं. यानंतर काँग्रेसने आशिष देशमुख यांना नोटीस बजावली. आता आशिष देशमुख भाजपा प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटायला त्यांच्या घरी पोहचले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीविषयी पत्रकारांशी बोलतांना आशीष देशमुख म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे हे माझ्याबरोबर आमदार होते, मंत्री होते. ते त्यावेळचे आमचे अतिशय उर्जावान उर्जामंत्री होते. याशिवाय पालकमंत्री म्हणून त्यांनी नागपूरसाठी जे काम केलं ते नक्कीच उल्लेखनीय होतं. आज त्यांनी मला त्यांच्या निवासस्थानी नाश्त्यासाठी बोलावलं. त्यासाठी मी येथे आलो आहे.

चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी आमचे अतिशय जीवलग मित्रही आहेत. ते विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत आहेत. त्याअनुषंगाने आमचे काही कामं नक्कीच असतात. शिवाय नाश्त्याला बोलावलं असल्याने नाही म्हणता येत नाही. माध्यमांनी राजकीय अर्थ अनर्थ काढण्याची काही गरज नाही. शेवटी चहा-नाश्ता याचा आस्वाद घ्यावा.