शिकले तेवढे अडाणी!

वेध

– प्रफुल्ल व्यास

सायबर क्राईम म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून होणारे गुन्हे! सायबर गुन्ह्यांचा आवाज अलिकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात येत असला, तरी त्याची सुरुवात 1820 च्या सुमारास फ्रान्समध्ये झाल्याची नोंद पोलिस विभागात आहे. एका कापड उत्पादकाने सुरू केलेल्या उद्योगाने रोजगारीवर परिणाम होईल, या भीतीने त्या तंत्रज्ञानाचा बीमोड करण्यासाठी तोडफोड केली आणि तोच पहिला सायबर गुन्हा म्हणून नोंदवला गेला. भारतात 1999 मध्ये सायबर गुन्ह्यातील पहिला प्रकार पुढे आल्याची प्राथमिक नोंद आहे. मात्र, हा संगणकीय गुन्हा कसा घडतो या गोष्टीकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे; ती म्हणजे चोर पोलिसांच्या दोन पावले कायम पुढे असतो. चोराला कायद्याची भीती असली, तरीही त्याला कायद्याच्या चौकटीत राहायचे नसते. त्यामुळे तो कसाही वागू शकतो. मात्र, पोलिसांना कायद्याच्या चौकटीतच कर्तव्य पार पाडावे लागत असल्यामुळे त्यांना मर्यादा असतात. बदललेल्या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍यांना पुरेपूर ज्ञान मिळत नाही आणि जे या संगणकीय तंत्रज्ञानाच्या जाळ्याचे परिपूर्ण ज्ञान न मिळवता भावनेच्या भरात जाऊन काम करतात ते स्वत:ला आळा घालत नाहीत तोपर्यंत सायबर गुन्ह्यांवर आळा बसणे शक्य नाही.

सायबर गुन्हेगारी हा बेरोजगारीप्रमाणे भारताचीच समस्या आहे असे नव्हे; हा प्रकार सर्वच देशांमध्ये होत असल्याने ही जगाची समस्या आहे. त्यामुळे या गुन्ह्यास जागतिक स्तरावर गुन्हा म्हणून मानण्यात यावे. देशात हरयाणा, दिल्ली, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तरप्रदेश, गुजरात आणि आंध्रप्रदेश या 9 राज्यांना सायबर क्राईमने डोक्यावर घेतले आहे. या गुन्ह्यात पुढारलेला महाराष्ट्र मात्र मागे आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल. संगणक प्रणालीद्वारे होणार्‍या गुन्ह्यांमध्ये सायबर स्टॉकिंग (सायबरविश्वातून होणारा पाठलाग), सायबर पोर्नोग्राफी (सायबरविश्वातून पसरविली जात असलेली अश्लीलता), सायबर डीफमेशन (बदनामी), मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकुरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे), ई-मेल स्फुफिंग (ई-मेलद्वारे होणारे विडंबन) यांचा समावेेेश होतो आणि वरील पाचही प्रणाली साधारणत: सुशिक्षित लोकच वापरतात. आजच्या काळात स्मार्टफोन घरी भांडी घासणार्‍या मोलकरणींपासून सर्वांकडेच आढळतो. पण, बँकेमधून बोलतोय; तुमचे एटीएम कार्ड बंद झाले, ते पुन्हा सुरू करण्यासाठी नंबर द्या… या खोट्या जाळ्यात फसणार्‍यांची संख्या मात्र सुशिक्षितांचीच जास्त आहे. वर्धेसारख्या जिल्हास्थानावर सरासरी दिवसाला तीन लाख रुपये सायबरच्या माध्यमातून उडवले जात असल्याची नोंद ऑक्टोबर महिन्यात घेतली गेली होती.

सायबर गुन्हा ही संज्ञा संगणक व इंटरनेटशी संबंधित असणार्‍या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणार्‍या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर Cyber crime सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा, 4-5 जी सेवा पुरविण्यार्‍या कंपन्यांनी सुरक्षिततेचे बळकट उपाय योजण्याची गरज आहे. वैयक्तिकरीत्या इंटरनेट वापरणार्‍यांनी सायबर क्राईमबाबत जागरूकता बाळगणे महत्त्वाचे आहे. सायबर गुन्हेगारी थांबण्यासाठी प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. व्हिडीओ, ऑडिओ, सॉफ्टवेअर पायरसी रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह, जातीय तेढ, अफवा अथवा एखाद्या व्यक्ती, समाजाबद्दल निंदा अशा आशयाचे संदेश टाकणे अथवा फॉरवर्ड करणार्‍यांवर सायबर सेल लक्ष ठेवून आहे. सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. आजही समाजात आपली बदनामी होईल या भीतीने अनेकजण पोलिसात तक्रार करीत नाहीत. वर्धेतील सायबर विभागातील पोलिसांनी आर्वी येथील एका व्यक्तीचे बँकेतून उडवलेले लाखो रुपये परत मिळवून दिले. मात्र, आपली बदनामी होईल या भीतीने त्या व्यक्तीने तज्ज्ञ, जाणकार व्यक्तीशी चर्चा केली नाही. सायबर गुन्ह्यातून स्वत:चा बचाव करायचा असेल तर सतर्कता आणि स्वत:ला अद्ययावत ठेवणे हीच खरी सुरक्षा आहे. इंटरनेटच्या सकारात्मक वापराबरोबरच दुष्प्रवृत्तींद्वारे केला जाणारा दुरुपयोग सर्वसामान्यांचे जीवन, राष्ट्राची सुरक्षा, अर्थव्यवस्था डळमळीत करू शकतो, हे मात्र तेवढेच सत्य! स्वत:ला बुद्धिमान, हुशार समजण्याच्या नादात सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून कधी कधी आम्ही अडाणीही ठरतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

– 9881903765