भुसावळ : पहिले लग्न केले असतानाही दुसरे लग्न करून विवाहितांनी दोन घटनांमध्ये भुसावळ तालुक्यातील दोन युवकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लग्नाच्या आमिषाने तरुणांना गंडवणार्या टोळ्या जिल्ह्यात सक्रिय झाले असतानाच भुसावळ तालुक्यातील दोन युवकांची फसवणूक झाल्याची बाब समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
खेडीच्या तरुणाची फसवणूक : नववधूसह दहा संशयीतांविरोधात गुन्हा
भुसावळ तालुक्यातील खेडी बु.॥ येथील प्रवीण वसंत पाटील (25) या तरुणाने तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, निकीता प्रवीण पाटील (कंडारी, ता.भुसावळ) या तरुणीशी त्यांचा विवाह झाला होता मात्र नववधूसह तिच्या नातेवाईकांनी खोटे व बनावट दस्तावेजाद्वारे तक्रारदाराची फसवणूक करीत तरुणीचा दुसर्या ठिकाणी विवाह उरकला. तरुणीने घरातून जाताना दागिणे व कपडेलत्तेदेखील लांबवल्याची बाब उघडकीस आल्याने तरुणाने तालुका पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर नववधू दहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 24 फेब्रुवारी 2018 ते 31 ऑक्टोंबर 2022 दरम्यान हा सर्व प्रकार कंडारी व खेडी बु.॥ येथे घडला.
या संशयीतांविरोधात गुन्हा
प्रवीण पाटील यांच्या तक्रारीवरून नववधू निकीता प्रवीण पाटील (लग्नानंतरचे नाव) उर्फ निकीता रोहित महाजन (दुसर्या लग्नानंतरचे नाव), सासरा नरसिंग गणेश पाटील, सासु पुष्पाबाई नरसिंग पाटील, शालक गौरव नरसिंग पाटील, विरसिंग गणेश पाटील (सर्व रा.नागसेन कॉलनी, कंडारी), रोहित उर्फ गोविंदा प्रताप महाजन (नववधूचा दुसरा पती), प्रतापसिंग वामन महाजन (मुलाचे वडिल), देवकाबाई वामन महाजन (मुलाची आई), विजुबाई उर्फ विजया राजेंद्र पाटील व राजेंद्र धनसिंग पाटील (दुसरे लग्न लावणारे मध्यस्थ, तिन्ही रा.मनमाड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश राठोड करीत आहेत.
शिरपूर कन्हाळ्यातील तरुणाचीही फसवणूक
भुसावळ तालुक्यातील शिरपूर कन्हाळा गावातील तरुणाचीदेखील फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिले लग्न केले असताना दुसरे लग्न लावून तरुणाची फसवणूक करण्यात आली शिवाय नवविवाहिता घरातून दागिने व कपडेलत्ते घेवून पसार झाल्या प्रकरणी नववधूसह सहा संशयीतांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
शिरपूर कन्हाळा गावातील रहिवासी असलेल्या राजेंद्र आत्माराम कांबळे (26) या तरुणाचा नेहा राजेंद्र कांबळे (21, जनता वसाहत, पाचोरा) या तरुणीशी विवाह झाला होता मात्र तरुणीने घरातील दागिण्यांसह कपडेलत्ते घेवून पळ काढत दुसरा विवाह करीत तरुणाची फसवणूक केली. या प्रकरणी नववधू नेहा कांबळे, भास्कर ओंकार पवार (50), चंदाबाई ओंकार पवार (71 (दोन्ही रा.सम्राट अशोक नगर, पाचोरा), विजय नाना साळवे (25), सचिन लक्ष्मण केदार (27), विकास रमेश थोरात (26, तिन्ही रा.जनता वसाहत, बसस्थानकाजवळ, पाचोरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुभान तडवी करीत आहेत.