मनोज माळी
तळोदा : शहराला लागून असलेल्या गुजरातच्या जुना आमोदा गावात ४ वर्षीय बालकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. नागरिकांनी लागलीच धाव घेतल्याने बालकाचे प्राण वाचवण्यात यश आले. गुजरात वनविभागाने पिंजरा लावून हल्लेखोर बिबटया जेरबंद केल्याने परिसरातील भयभीत नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे.
तळोदा शहराला लागून असलेल्या गुजरातच्या जुना आमोदा गावात दि . 27 नोव्हेंबर रोजी गजानन रामदास मगरे यांच्या घराशेजारी बिबट्याने तक्ष संजयभाई चौधरी (पाडवी) या 4 वर्षाच्या बालकावर हल्ला केला. मुलाच्या आईला व एका गावकऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी धाव घेत बालकाला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. गंभीर जखमी बालकाला उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल केले. नंतर पुढील उपचारासाठी व्यारा जि. तापी येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलविले. तक्ष चौधरीची तब्येत आता धोक्याबाहेर आहे.
गुजरात वनविभागाने गावकऱ्यांच्या मागणीवरून हल्ला झाला त्या घराशेजारील अलकेश दगडू मराठे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी दि 29 नोव्हेंबर रोजी पिंजरा लावला त्या पिंजऱ्यात दि 30 नोव्हेंबर च्या पहाटे नरभक्षक बिबटया जेरबंद झाला असून त्याला उच्छल येथे हलविण्यात आले आहे. गुजरात वनविभागाच्या व गांवकर्यांच्या सतर्कतेने त्वरित नरभक्षक बिबटया पकडला गेल्याने भयभीत नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
विशेष म्हणजे बिबट्याने गांवातील घराशेजारी येऊन रस्ता व त्याला लागून शेत अश्या वर्दळीच्या ठिकाणी बालकावर हल्ला केल्याने बिबटे आता गांवात सुद्धा येऊन हल्ला करू लागले आहेत आमोदा गांवाला लागून लगेच तळोदा शिवराची म्हणजे महाराष्ट्राची हद्द लागते तेथे 2 ते 3 बिबट्यांच्या नियमित संचार आहे म्हणून तेथील शेतकरी सुद्धा भयभीत आहेत त्यातच आता कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे बिबट्याच्या भीतीने मजूर कापूस वेचणीला येत नाहीत तर शेतकरी सुद्धा शेतात जायला धास्तावले आहेत म्हणून महाराष्ट्र वनविभागाने सुद्धा महाराष्ट शिवारात पिंजरा लावून उर्वरित बिबट्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.