नंदुरबारमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत : आईच्या डोळ्यांदेखत बालकाला उचलून नेले

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणात जेवण करायला बसलेल्या बालकाला बिबट्यानं आईच्या डोळ्यादेखत उचलून नेत त्याला ठार केलं. सुरेश भाईदास वसावे वय ९ असे मयत बालकाचे नाव आहे. मंगळवारी ४ रोजी  संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वनविभागाने पंचनामा केला आहे. दरम्यान, अंगणात जेवायला बसलेल्या एका महिलेला देखील बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात ही घडली आहे. ९ वर्षीय सुरेश हा ४ एप्रिलला संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पुनर्वसन शिवारातील शेता समोरील आपल्या घराच्या अंगणात जेवण करत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला जवळच्या अमेरिकन मक्याच्या शेतात नेऊन गंभीरित्या जखमी केले. त्यामुळे सुरेशचा जागेवरच मृत्यू झाला.

सदर बालकाच्या पृष्ठभागावर तसेच मानेवर बिबट्याने लचके तोडले. यामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याने मुलाच्या शरीरातील पूर्ण रक्त पिऊन घेतल्याने शरीर कोरडे पडले होते.

दरम्यान, मुलाच्या काकूने आरडाओरड करून सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, वन विभागाचे वनक्षेत्रपाल एल डी गवळी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत आदींनी घटनास्थळावर धाव घेऊन मुलाचा शोध घेतला. घटनेनंतर वन विभागाने जागेवर पंचनामा करून सदर बालकास शवविच्छेदनासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविले.