---Advertisement---
तळोदा : शहरलगत आठ दिवसात बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला चढविला आहे. पाडवी गल्ली जवळील परिसरात बिबट्याने शनिवारी ( ३० ऑगस्ट) १ ते 2 वाजे दरम्यान रात्रीच्या सुमारास गायीवर हल्ला करुन ठार केल्याच्या घटनेने प्रचंड दहशत पसरली आहे. पाडवी गल्लीच्या पश्चिम दिशेला महिला व पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयाजवळ देविसिंग महारु पाडवी (रा. पाडवी गल्ली तळोदा) यांच्या गायी एका झाडाला बांधल्या होत्या. त्यापैकी एका गायीवर बिबट्याने हल्ला चढवत १०० मीटर फरफटत नेत देविसिंग पाडवी यांच्याच बटाई करीत असलेल्या शेतात गायीचा मागील भाग खाऊन फस्त केला.
पाडवी गल्लीच्या अगदी हाकेच्या अंतरावर बिबट्याच्या शिकारीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात भारत मिल ऑइल परिसरात बिबट्याने घोड्याचा फडशा पाडला होता. त्याच परिसरालगत दुसऱ्या हल्ल्यात गायीला भक्ष्य करुन बिबट्याने दहशत माजवली आहे.
घोड्यावरील हल्ल्यानंतर नागरिकांनी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली होती. परंतु, वनविभागाकडून कुठलीच हालचाल न झाल्याने गायीची शिकार करुन बिबट्याने पुन्हा वनविभागास चॅलेंज केले आहे. नागरी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचाराने मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे.
वनविभागाने चीनोदा शिवारात दोन तर काजीपूर शिवारात एक पिंजरा लावलेला आहे.पाडवी गल्ली परिसरात त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वाढली आहे. शिकार करुन बिबट जंगलात पसार होत आहे. रात्रीची संधी साधत पाळीव प्राण्यांना ठार करुन बिबट आपली भुक भागवत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागास सफलता मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांच्या संचारास मर्यादा आली आहे.