तळोदा (मनोज माळी) : नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून, ९ जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात एका वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खुर्चीमाळ ता. अक्कलकुवा येथे घडली आहे. रोडवीबाई खाअल्या नाईक (८०) असे मृत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.
रोडवीबाई नाईक या मध्यरात्री लघुशंकेसाठी आपल्या घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर गेल्या असता, बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने त्यांना फरफटत नेत ठार केले. सकाळी या घटनेचा उलगडा झाल्यावर गावकऱ्यांनी याची माहिती पोलिस व वन विभागाला दिली.
घटनेनंतर तळोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, उपनिरीक्षक पवार, अक्कलकुवा वनपरिक्षेत्र अधिकारी ललित गवळी, पशुवैद्यकीय अधिकारी धैर्यशील पडवळ व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ
तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत अनेक नागरिक आणि पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्गाने वन विभागाकडे कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी एकमुखी मागणी होत आहे. वन विभागाने या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.