तळोदा : तालुक्यातील कळमसरे शिवारात लकी सखाराम पाटील यांच्या शेतात मंगळवारी (दि. 7 जानेवारी) रात्री वनविभागाने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या मादी व तिचा बछडा जेरबंद करण्यात यश आले.
मोहिदा येथील लोकेश पाटील यांच्या पोल्ट्री फार्मवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचे दर्शन झाले होते. यावरून वनविभागाने लकी पाटील यांच्या शेतात सापळा लावला होता. त्यात रात्रीच बिबट्या मादी व तिचा बछडा दोघेही अडकले.
बिबट्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय
तळोदा तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी व मजूर यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जाण्यापूर्वी फटाके फोडून बिबट्यांना पळवून लावण्याची पद्धत शेतकऱ्यांनी स्वीकारली आहे. यामुळे शेतीचे काम मोठ्या भीतीत पार पडत आहे.
वनविभागाची टाळाटाळ
जेरबंद बिबट्यांना नक्की कुठे सोडले जाते याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टता मिळत नाही. याबाबत विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांनी फोन न उचलण्याची भूमिका घेतली. यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बिबट्यांची संख्या चर्चेचा विषय
तळोदा तालुक्यातील बिबट्यांची नेमकी संख्या किती आहे, याबाबत कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. जेरबंद केलेले बिबट्यांचे प्रमाण वाढत असले तरी अजूनही बिबट्यांचे दर्शन होण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे शेतकरी आणि स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.