तळोदा : तालुक्यातील वस्त्यांमध्ये, शेतातील वाढता वावर आणि गावकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे बिबटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षभरात एकट्या तळोदा तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अनिल करमसिग तडवी (९) असे मृत बालकाचे नाव आहे.
दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्त्यात हा दुसरा मानवी बळी असून तालुक्यात पाचवा मानवी बळी गेला आहे. बालकाच्या मृत्युमुळे पारिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बिबट्यास वन विभागाने वेळीच जेरबंद केले असते तर या बालकाच्या बळी गेला नसता, अशी चर्चा ग्रामस्थनमध्ये असून, विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दलेलपुर गावाजवळील शेतात २ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सरदार नगर पुर्नरवसन क्र. २ येथील तडवी करमसिंग यांचा मुलगा अनिल करमसिग तडवी (९) हा सुदाम बाबुराव मराठे यांच्या शेतात आपल्या २-३ मित्रांसोबत तुरीच्या शेतात रखवाली करत असताना त्याच्यावर बिबटयाने अचानक हल्ला केला. यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने गांवकऱ्यानी लागलीच धाव घेतली. तत्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविले मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती घोषित केले.
शासनाने उपाययोजना म्हणून अनेक बिबट्यांना जेरबंद केले आहे. परंतु तरीदेखील बिबट्या मानवावर हल्ला करीत आहे. शासन व प्रशासन यांना बिबट्याचा हल्ला थांबवता येत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.