तरुण भारत लाईव्ह न्यूज । प्रा. वा. ना. आंधळे । पूर्वी आजी-आजोबा नावाचं विचारधन घराघरात असायचं. त्यामुळे बालमनावर संस्काराची सुलभ पेरणी आणि बालमनाची यथासांग मशागत व्हायची. किंबहुना नियतीने जणू त्यांच्यावर ही जवाबदारीच सोपवलेली असे. माझी आजी तर नातवंडांची प्रसंगी आई, बहीण, मावशी आणि मैत्रीण या विविध रुपातूनच आमच्या मनात घर करून राहिली. तिच्या आभाळमायेची सावली तिच्या शेवटच्या श्र्वासापर्यंत आम्हा सार्या भावंडांवर राहिली. तिच्या उदंड प्रेमातून उतराई होण्यासाठीच की काय आज माझ्या मनाचे बांध जागोजागी फुटलेत आणि शब्दरूप होण्यासाठी अधीर झालेत.
माझी आजी म्हणजे लाखात एक. तिचा स्वभाव आयुष्यभर ज्ञानदेवांच्या पसायदानाचाच एक भाग बनून राहिला. कष्टात, श्रमात देव पाहणार्या या माझ्या आजीनं श्यामच्या आईचा अनुनय करीत आम्हा सार्या भावंडांना घडविण्यातच तीर्थयात्रा केल्याचं समाधान मानलं. कुठल्याच इयत्तेचं शिक्षण नसलेल्या या आजीचं गणित आणि ललित मात्र कमाल उंची गाठणारं होतं, याची जाणीव मला समज आल्यापासून आज मितीपर्यंत ठायी ठायी होते आणि मी नखशिखांत सुखावतो.
आज तिच्या असंख्य आठवणी माझ्यासोबत असून त्यांना मी दस्तऐवजासारख्या जपून ठेवल्या आहेत. त्यातल्या एक दोन आठवणी प्रस्तुतप्रसंगी आवर्जून मांडव्याशा वाटतात.
रोजची सायंकाळ म्हणजे आम्हा नातवंडांची पर्वणी. आजीला आम्ही (बोय) या शब्दाने हाक द्यायचो. खान्देशात आजीला बोय या संबोधनाने उच्चारले जाते. बोय एक गोष्ट सांग ना, असे म्हणत आम्ही तिला अक्षरशः भंडावून सोडत असू आणि बोय दररोज नवनवीन गोष्टी आम्हाला सांगायची. त्या सगळ्याच गोष्टी माणूस आणि माणुसकीच्या पिंडाभोवती वावरणार्या असायच्या.
तिच्या अंतरीच्या धाव्याना अर्थात तिचा स्वभावच कारणीभूत होता, हे आम्हाला समज आलेल्या वयात पुरेपूर पटलं. आजीचं निखळ देवत्व आमच्या मनमंदिरात तीर्थक्षेत्र बनून आहे. कथाकथनात अव्वल असणारी माझी आजी ओवी रचण्यात आणि ओवी गायनातही तितकीच आघाडीवर असायची. तिच्या रूपानं आमच्या शेणामातीच्या घरात मोठ्ठं ग्रंथालय असल्याचा भास आम्हाला व्हायचा.
जात्यावर बसून कडधान्यांचा भरडा करताना ती आमचेच गुणगान करायची. तिच्या गुणगाणात सुखाच्या अन् आनंदाच्या राशींचा जणू ढीग लागत असे. ती श्रमताना आम्हाला थकलेली कधी दिसली नाही. आमच्या बाललीला (चुका) दुरुस्त करताना चिडलेली दिसली नाही. सुनांवर म्हणजे माझ्या आईवर व काकूवर कधी रुसलेली दिसली नाही. शेतात अन् घरात कधी रिकामी बसलेली दिसली नाही. तिची प्रत्येक कृती आमच्या घडणीत मोलाची कामगिरी बजावून गेली.
अशा या प्रेमळ आजीनं आम्हा नातवंडांना तिच्या हयातभर खूप काही दिलं. तिने जे जे दिलं ते आम्हा भावंडाना आमच्या हयातभरासाठी कामी येतंय; ’ते म्हणजे कवित्व.’ आजीची कल्पकता आणि सुजनशीलता आमच्या मनीअंतरी, श्र्वासी मासी इतकी रुजली की त्यातून म. ना. आंधळे आणि वा.ना. आंधळे ही ओळख आम्हाला समाज मनापर्यंत नेण्यात बर्यापैकी यश मिळाले. ही आत्मप्रौढी नसून आमच्या या गोड आजीचा आशीर्वाद व त्या आशीर्वादाविषयीची ही निस्सीम कृतज्ञता.
आई-वडील, बहीण-भाऊ हे लेखन विषय साहित्यात नेहमीच होताना दिसून येतात, अर्थात ही क्रमप्राप्तता मीही नाकारत नाही. पण वर्तमानातल्या नात्यांच्या पडझडीच्या काळात कितीतरी आजी-आजोबांना वृद्धाश्रमांचा आधार घ्यावा लागतो. नाही तर परिवारात राहूनच वनवासाचे दुःख झेलावे लागते. त्यावेळी मात्र शब्दांचे डोळे होतात आणि भावनांची आसवं ओसंडून वाहू लागतात. माझं नेमकं तेच झालं असावं.
आज माझ्या या मवाळ आजीला स्वर्गस्थ होऊन 24 वर्षे झालीत. तरीही तिचं जगणं आमच्या जगण्यात वास्तव्य करून आहे. आमच्या मनाची पान नि पान तिच्यामुळेच समृद्ध झाल्याचे क्षणाक्षणाला जाणवते. आजी तू दिलेल्या शब्दफुलांची माळा तुझ्याच चरणी अर्पण करतो. तू पुन्हा जन्म घे आणि आजी होऊनच ये, ही प्रार्थना नियंत्या चरणी करतो.