बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने एका बँकेचा परवाना रद्द केला असून, या बँकेत भांडवलाशी संबंधित समस्या आढळून आल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बँक कोणती आणि किती ग्राहकांचे नुकसान होणार आहे हेही जाणून घेऊयात…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नव्हते आणि भविष्यात कमाईची क्षमताही कमी होती. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेला 12 नोव्हेंबर 2024 पासून व्यवसाय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्राहकांचे होऊ शकते 4% नुकसान
आरबीआयच्या आदेशानुसार, बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे सुमारे 4 टक्के ग्राहकांचे नुकसान होऊ शकते. मात्र, चांगली बाब अशी आहे की या निर्णयाचा 95.8 टक्के ग्राहकांवर परिणाम होणार नाही. त्यांना बँकेत जमा केलेले पैसे पूर्ण मिळतील. त्यांच्या ठेवी परत करण्याचे काम डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे केले जाईल. देशातील लोकांना त्यांच्या बँकांमधील एकूण 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळते.
आरबीआयने आपल्या आदेशात आंध्र प्रदेशचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्याची विनंती केली आहे. एवढेच नव्हे तर बँक बंद करण्यासाठी या संस्थांना लिक्विडेशन ऑफिसर नेमण्यासही सांगण्यात आले आहे.
एवढी रक्कम ऑगस्टपर्यंत वाटण्यात आली ही बँक बंद होण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे DICGC ने 31 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 9.84 कोटी रुपये भरले होते.
दुर्गा कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा परवाना रद्द करण्याबाबत आरबीआयने म्हटले आहे की, बँक बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट-1949 चे नियम पाळत नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून बँकेचा परवाना रद्द केला आहे.