---Advertisement---
जळगाव : पत्नीने दारू प्यायल्याच्या संशयावरून पतीने क्रूरतेने तिचा खून केल्याच्या खटल्यात जळगाव सत्र न्यायालयाने ९ ऑक्टोबर, गुरुवारी निकाल देत, आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत आरोपीच्या मुलाने वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष महत्वाची ठरली.
चाळीसगावच्या मेहुणबारे येथील गिरणा नदीकाठावरील एका शेतात कुवरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, बडवानी, मध्य प्रदेश) हा पत्नी निनूबाई सोबत सालगडी म्हणून राहत होता. १८ मार्च २०२२ रोजी रात्री १० च्या सुमारास, कुवरसिंगने निनूबाईला ‘तू दारू का पिलीस?’ असे विचारून भांडण सुरू केले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या लोखंडी कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात वार केला. रक्तस्राव झाल्याने निनूबाईचा जागीच मृत्यू झाला. चौकशीदरम्यान, कुवरसिंगने दारू पिण्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली.
दिनेश पावरा यांनी फिर्याद दिली तर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासले गेले, ज्यात फिर्यादी ज्ञानेश्वर माळी, पंच साक्षीदार, डॉ.ए.वाय. शेख आणि तपास अधिकारी यांचा समावेश होता. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोपीचा मुलगा गणेश कुवरसिंग पावरा याने न्यायालयात वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष निर्णायक ठरली.
जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी या खटल्यात सरकार पक्षातर्फे काम पाहिले. न्यायाधीश एस.एन. राजुरकर यांनी सर्व साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपी कुवरसिंग पावराला भा.दं.वि. कलम ३०२ नुसार दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि २ हजार दंड ठोठावला.