तरुण भारत लाईव्ह । २८ ऑगस्ट २०२३। काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर या प्रकरणामुळे देशात सर्वत्र खळबळ माजली होती.आता पुन्हा एक लिव्ह-इन पार्टनर तरुणीच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. २४ वर्षीय तरुणाने त्याच्या समवयीन लिव्ह-इन पार्टनरची कुकरने हत्या केली असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
वैष्णव व देवी हे दोघे केरळचे आहेत. ते शिकायलाही सोबतच होते. गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहात होते. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित चाललं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वैष्णवला देवीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. देवी त्याची फसवणूक करत असल्याची शंका त्याच्या मनात होती. याच कारणावरून त्या दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते.
याच कारणाने वाद विकोपाला गेल्यान रागाच्या भरात वैष्णवनं घरातला कूकर देवीच्या डोक्यात घातला. यात ती गंभीर जखमी झाली. देवीच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. काही आप्तस्वकीयांनी तिला रुग्णालयात दाखल केलं खरं. पण प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे देवीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. हा सगळा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे.
याप्रकरणी मायको लेआऊट पोलीस स्थानकात यासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डीसीपी सी. के. बाबा यांनी दिली आहे. तसेच, या प्रकरणी वैष्णवला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.