---Advertisement---
जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनावर तयारी सुरू करण्यात आली असून, सरपंचपद आरक्षणासह गट-गण रचनाही केली जात आहे. दुसरीकडे इच्छुकांकडूनही मोर्चेबांधणीसह राजकीय नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून २२ जुलैला मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील तीन हजार २३१ कंट्रोल, तर तीन हजार ३३२ बॅलेट युनिट जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०११ च्या लोकसंख्या व मतदार वाढ लक्षात घेता, प्रारूप प्रभाग, गण-गट रचना तयार करण्यात आली आहे. यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून, ऑगस्टदरम्यान यावर सुनावणी घेतली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, पंचायत आदी सार्वत्रिक निवडणूक मतदारसंख्या, बदल झालेले गण गट यासंदर्भात प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे.
यासंदर्भात २२ जुलैला प्रत्येक तहसील कार्यालयात मतदान यंत्रांची प्राथमिक स्तरावर तपासणी होणार आहे. त्यानंतर स्थितीचा आढावा घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडे मतदान यंत्रांची मागणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.
पालिकानिहाय मतदारसंख्या निश्चिती
१ जुलैच्या नोंदणीनुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यास पालिकानिहाय मतदारसंख्या निश्चिती करण्यात आली आहे.
१८ नगरपरिषदांसाठी नऊ लाख मतदार
मुक्ताईनगर आणि शेंदुर्णी नगरपंचायतींसाठी ४४ हजार ८५९, अन्य १६ पालिकांसाठी आठ लाख ४६ हजार १५४ मतदार असणार आहेत, तर जिल्हा परिषदेसाठी २४ लाख २ हजार ४०२ मतदार असतील.
शेतकरी विधवा महिलांची घेतली भेट
महसूल दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींची घरी जाऊन भेट घेतली जात आहे. त्यातून त्यांच्या प्रश्नांना निकाली काढण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचा विश्वासही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी व्यक्त केला.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १२ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची पाचवी बैठक घेतली. बैठकीत मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधींची नियुक्ती, मतदार याद्यांची तपासणी आणि २२ जुलैला मतदान यंत्रांच्या तपासणीवेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.