---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटना दररोज घडत आहेत, आणि या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार धडक कारवाई करत जामनेर व भुसावळ परिसरातून चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत दोन तरुण आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

जामनेर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील तसेच भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यातील अशा एकूण तीन चोरीच्या दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी आपल्या एका साथीदाराच्या मदतीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली चौकशीत दिली आहे.
या प्रकरणातील जप्त मुद्देमाल आणि आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी आणि पथकाच्या सतर्कतेमुळे ही कारवाई यशस्वी ठरली.









