Lohara Sarpanch : लोहारा सरपंच अक्षय जैस्वाल अपात्र ; दिव्यांगांच्या निधीत घोळ करणे भोवले

Lohara Sarpanch : पाचोरा: लोहारा येथील ग्रामपंचायत सरपंच अक्षय जैस्वाल यांनी सन २०२१-२२ दिव्यांग कल्याण निधी ५ टक्के मध्ये अनियमितता करीत घोळ केल्याच्या कारणावरून नाशिक विभागीय आयुक्त यांनी ठपका ठेवत ६ फेब्रुवारी पासून अपात्र ठरविले आहे. नाशिक आयुक्तांच्या दणक्याने लोहाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

दरम्यान अक्षय जैस्वाल यांनी सदस्यांसह ३० जानेवारी रोजी भाजपा मध्ये प्रवेश केला होता. अपात्रतेची कारवाई टळावी यासाठी प्रवेश घेतल्याची चर्चा होती मात्र भाजपा प्रवेश ७ दिवसांपूर्वी होऊनही कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेचे विकास शिवदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील व सदस्यांनी ग्रामपंचायत लोहारा यांचे कडे दिव्यांग कल्याण निधी पाच टक्के हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून देण्यात यावा,अशी मागणी केलेली होती व तसे वारंवार स्मरणपत्र ही दिलेले होते मात्र सरपंच जैस्वाल यांनी दिव्यांगांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत जाणून बुजून दिव्यांगांना बँक खात्यात निधी न देता पंख्यांची खरेदी केली होती. व पंख्यांच्या खरेदीत शासकीय आर्थिक सूत्रांचे पालन न केल्याने व अनियमितता करत घोळ केल्याचा ठपका ठेवला आहे.

यावरून सरपंच जैस्वाल यांची विभागीय आयुक्त नाशिक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव यांचे मार्फत संपूर्ण चौकशी केली असता व दप्तराची प्रत्यक्ष पाहणी केली असता सरपंच जैस्वाल यांनी लाभार्थ्यांची मागणी नसताना ७० लाभार्थ्यांच्या इतके पंखे १लाख साठ हजार तीनशे रुपयांचे खरेदी केले व फक्त २५ पंखे वाटप करत ४५ पंखे ग्रामपंचायत मध्ये साठा रजिस्टर मध्ये शिल्लक आहेत, यावरून दिव्यांग कल्याण निधी खर्च करताना वित्तीय ओचित्यचे पालन न झाल्याने निधीचा अपव्यय झाला आहे ,असा ठपका ठेवला आहे. त्यावरून सरपंच हे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार अपात्र असल्याचे निकाल ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिला.

दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्था च्या सभासदांनी दिव्यांग कल्याण निधी पाच टक्के हा बँक खात्यातून ग्रामपंचायतीने द्यावा अशी मागणी केलेली असताना सरपंच अक्षय जैस्वाल यांनी मनमानी पद्धतीने दिव्यांग यांची मागणी पायदळी तुडवत शासकीय नियमांचे पालन न करता जाणून बुजून कमी किमतीचे चायनामेड पंखे खरेदी करून जास्त किमतीचे दाखवले .त्यातही अनियमिता करीत अपहार केला असल्याची तक्रार केली.नाशिक विभागीय आयुक्त यांनी न्याय देत मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या सरपंचाला घरी पाठवले..सत्य परेशान होता है पराजित नहीं!!

विकास शिवदे ,तक्रारदार

शासनाच्या प्रत्येक योजनांमध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचार करून खुर्चीची हाव असणाऱ्या सरपंच जैस्वाल यांनी दिव्यांगांच्या एक लाख साठ हजार तीनशे रुपयांचा निधीचा भ्रष्टाचार करणे ,ह्या निंदनीय प्रकाराचा निषेध व्यक्त करतो .
कैलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य लोहारा