Lok sabha election : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे तुतारी आणि अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हातील साधर्म्यामुळे शरद पवार गटाला फटका बसला. आता पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून, विधानसभेला खुल्या चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळावे, अशी मागणी शरद पवार गटाने आयोगाला पत्राद्वारे केली आहे.
सातारासह काही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचा दावा पक्षाने केला आहे. सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांचा ३२,७७२ मतांनी पराभव झाला. तेथे पिपाणी चिन्हाला ३७,०६२ मते पडली आहेत.
दिंडोरीत भास्कर भगरे यांनी भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा १,१३,१९९ मतांनी पराभव केला. इथे पिपाणीला तब्बल १,०३,६३२ मते मिळाली होती. लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.