Loksabha Election : ‘महायुती’ चे राज्यभर मेळावे; लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार

Loksabha Election :  आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून एकूण मतदानात महायुतीचा वाटा ५१ टक्क्यांपेक्षा जास्त राहणार असल्याचा विश्वास महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील ११ घटक पक्षांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना नेते (शिंदे गट), मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर भुजबळ, भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’ला ५१ टक्के मतांसह ४५ पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास बावनकुळे यांनी व्यक्त यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर राज्यभर १४ जानेवारी रोजी जिल्हावार मेळावे होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर मोदी लाट दिसू लागल्यामुळे यापुढील काळात ‘महायुती’मध्ये आणखी मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याचे भाकीत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
करसंक्रांतीच्या मुहूर्तावर, १४ जानेवारी रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांत ‘महायुती’तील ११ पक्षांचे संयुक्त मेळावे होणार आहेत. जिल्हा मेळाव्यांना घटक पक्षांचे जिल्हा पातळीवरील प्रमुख नेते, पालकमंत्री तसेच घटक पक्षांनी नेमलेले संपर्कमंत्री उपस्थित राहणार आहेत.

जिल्हास्तरीय मेळाव्यानंतर तालुका आणि बूथस्तरीय मेळावे घेण्याचा निर्णय ‘महायुती’ने घेतला आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये विभागीय स्तरावर मेळावे होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री, घटक पक्षांतील नेते या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत.

तटकरे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यासह ‘महायुती’तील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील समन्वय वाढावा, यासाठी हे मेळावे होणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत साकारण्यासाठी ‘महायुती’चे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत, असे तटकरे यांनी यावेळी सांगितले

केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी ‘महायुती’च्या घटक पक्षांचे मेळावे होणार आहेत. गाव पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक समन्वय निर्माण होण्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

– दादा भुसे, मंत्री