मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संस्था जनमाणसाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातही इंडिया टीव्ही व CNX चा संयक्त सर्व्हे करण्यात आला आहे. यंदाही महाराष्ट्रात मोदी मॅजिक चालणार असल्याचा दावा या सर्व्हेत करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीही बिकट अवस्था होणार असल्याचा दावा या सर्व्हेत करण्यात आला आहे. मात्र काँग्रेसला मोठा फायदा होवू शकतो, असेही यात म्हटले आहे.
इंडिया टीव्ही व CNX च्या संयुक्त सर्व्हेत हा दावा करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर भाजप 32 टक्के मतांसह आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला (शिंदे) 10 टक्के व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस या ठिकाणी अवघ्या 15 टक्के मतांसह पिछाडीवर पडण्याची शक्यता आहे. पवारांच्या पक्षाला 12 टक्के मते मिळताना दिसत आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अवघ्या 15 टक्के मतांवर समाधान मानावे लागू शकते. इतर पक्षांच्या खात्यांत 11 टक्के मते जाण्याची शक्यता आहे.
या सर्व्हेनुसार, मतांची टक्केवारी जागांमध्ये रूपांतरित झाल्यास भाजपला महाराष्ट्रात सर्वाधिक 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला (शिंदे) 4, तर राष्ट्रवादीला (अजित) अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागेल. याशिवाय काँग्रेसला 9, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळण्याचाही अंदाज आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आगामी निवडणुकीत गत निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला 8 जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेलाही (यूबीटी) 2 जागांचा फायदा होताना दिसत आहे. त्यांना 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांच्या खात्यात एकही जागा मिळणार नाही, असा दावाही यात करण्यात आला आहे.