जळगाव : लोकसभा निवडणुकीत जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांचा 7 कोटी 74 लाख 2 हजार 964 रुपये, तर रावेरमधील ‘महाविआ’चे उमेदवार श्रीराम पाटील यांचा 6 कोटी 42 लाख 130 रुपये आणि महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा 6 कोटी 11 लाख 648 रुपये खर्च झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार स्मिता वाघ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 14 आणि रावेरमध्ये 24 उमेदवार रिंगणात होते. जळगाव रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निरीक्षकांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले. यात स्मिता वाघ यांचा सर्वाधिक खर्च झाला. जळगाव लोकसभा मतदारसंघात एका उमेदवाराने केवळ 200 रुपये तर रावेरमधील एकाने 1100 रुपये खर्च करीत लोकसभा निवडणुक लढविल्याचे दिसून आले.
जळगाव लोकसभेचे निवडणुकीचे निरीक्षक कुमार चंदन आणि रावेर लोकसभेचे निवडणुकीचे निरीक्षक संदिपाल खान यांनी तीन टप्प्यात हिशेबाची पडताळणी केली. खर्चासह अन्य देयके सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 4 जुलैला ही मुदत संपल्यानंतर निरीक्षकांनी खर्चाचे विवरणावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.