Lok Sabha Elections : मुख्यमंत्री शिंदे आज शिवसेनेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेच्या चार ते पाच जागांवर आज शुक्रवारी सायंकाळी ६ नंतर पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची नावे जाहीर करू शकतात. मुख्यमंत्र्यांचे पुत्र कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे, मुंबई दक्षिण मध्यचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे, विदर्भातील बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील. हातकणंगलेतून खासदार धैर्यशील माने आदींना उमेदवारी दिली जाऊ शकते. एनडीएच्या महाआघाडीत शिंदे शिवसेनेला १३ जागा मिळू शकतात.

महाराष्ट्रातील सत्ताधारी एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागावाटपावर एकमत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यातील एकूण 48 जागांपैकी भाजप 31 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ जागा, तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार आहे.

शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या त्यांच्याकडे असलेल्या जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांपैकी भाजप 5 जागांवर, तर शिवसेना 1 जागा लढवणार आहे.