Lok Sabha Survey: लोकसभा निवडणुकीत राज्यात NDA की INDIA आघाडी, मैदान कोण मारणार?

Lok Sabha  Survey :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (India Alliance) आतापासूनच तयारीला लागली आहे. नवीन वर्षात एप्रिल किंवा मे महिन्यात देशभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजप तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे. तर इंडिया आघाडीही आपण विजय होणार असल्याचा दावा करत आहे. दरम्यान, एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे. यामध्ये राज्यात महायुतीला मोठा धक्का बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडी मागे टाकू शकते, अशी शक्यता वळवण्यात आली आहे. राज्यात एनडीए आघाडीला 19-21 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 26-28 जागा मिळण्याची शक्यता आहे

भाजप युतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा समावेश आहे. इंडिया आघाडीत राज्यात काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा समावेश आहे. राज्यातील मतांची टक्केवारी पाहिली तर येथेही इंडिया आघाडीला 41 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर एनडीएला 37 टक्के मते मिळण्याची शक्यता वळवण्यात आली आहे

गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास येथे भाजपला मोठा धक्का बसू शकतो. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. ज्यामध्ये एनडीएने एकूण 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. तर युपीएला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला 18, राष्ट्रवादीला 4 आणि काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती. त्याचवेळी एआयएमआयएमचा एक खासदारही विजयी झाला होता.