मुंबई : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा-विधानसभा एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. येत्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भाजपला जागा दाखवणार असा इशाराही संजय राऊतांनी दिला.
राऊत म्हणाले की, राज्यातील आणि केंद्रातील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण चालू आहे. ही महाराष्ट्राची कधीच परंपरा नव्हती. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पण आता प्रत्येक ठिकाणी जात दाखवा, अशा प्रकारचे जात दाखवण्याचे काम राज्य करत आहे. आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला त्यांचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल. शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व याबाबत कधीही समझोता करणार नाही, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी ठाण्यातील कार्यक्रमात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यावर संजय राऊतांनी खोचक टीका केली. कुणी कुणाच्या वाटेला गेले नाही. राज ठाकरेंच्या वाट्याला जाण्याइतका पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्रीपद का गेले हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर त्यांच्या पक्षाची आणखी वाढ व्यवस्थित होणे गरजेचे आहे, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.