पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. रोहित टिळक यांनी ही घोषणा केली आहे. 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरवर्षी पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट वतीने पुरस्कार दिला जातो. टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी शरद पवारांना देखील आमंत्रण देण्यात येणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे सत्तानाट्यानंतर पहिल्यांदात राजकीय नेत्यांची मोठी फळी या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन.आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह बाकी दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनवेळा पुण्यात आले होते. त्यावेळी पुण्यात जय्यत तयारी करण्यात आली होती. पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी मोदी आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते पालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यानंतर देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यासाठी मोदी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वारकरी सांप्रदायाचं कौतुक केलं होतं. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच असल्याचं सांगितलं होतं. आता पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहे. 2024 च्या निवडणुकादेखील आहेत. त्यासंदर्भात काही बोलतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.