Loksabha 2024 : भाजपची दुसरी यादी तयार, इतक्या उमेदवारांची नावे लवकरच जाहीर होणार

नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसापूर्वी भाजपने आपल्या पहिल्या यादीत लोकसभेच्या १९५ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामुळे दुसरी यादी कधी जाहीर होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच भाजपने लोकसभा उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी अंतिम केली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 90 उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. यापैकी महराष्ट्रातील 25 जागांचा समावेश आहे

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या या बैठकीत 7 राज्यांतील सुमारे 90 उमेदवारांची नावे निवडण्यात आली आहेत. याबाबत पक्ष लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रल्हाद जोशी  सहभागी झाले होते.

या जागांसाठी नावे निश्चित केली
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत गुजरातच्या उर्वरित 11 लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली. त्यापैकी सात जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. त्याचवेळी मध्य प्रदेशातील उर्वरित पाच जागांपैकी चार जागांसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. तर बैठकीत काही राज्यांतील उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील 25, तेलंगणातील 8, हिमाचलमधील 4 आणि कर्नाटकातील सर्व 28 जागांचा समावेश आहे.

पहिल्या यादीत 195 नावे जाहीर करण्यात आली
भाजपने 2 मार्च (शनिवार) रोजी 195 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 51 जागांसाठी तसेच पश्चिम बंगालच्या 20 जागा, मध्य प्रदेशच्या 24 जागा, गुजरात आणि राजस्थानच्या प्रत्येकी 15 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यासोबतच केरळमधील १२ जागांसाठी, तेलंगणा, आसाम, छत्तीसगड आणि झारखंडमधील प्रत्येकी ११ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले.