लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नाही, ओम बिर्लांच्या नाराजीचं हे आहे कारण

नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. विविध मुद्द्यांवर संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरु आहे. लोकसभेत मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच संतापले आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी बिर्ला संसद भवनात असूनही लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले नाहीत.

सभागृहात शिस्तीचं पालन होत नाही, तोपर्यंत आपण अध्यक्षांच्याच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे ओम बिर्ला यांनी सांगितले. सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. सभागृहांची मर्यादा राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. सभागृहातील काही सदस्यांची वागणूक सभागृहाच्या परंपरांच्या विरोधात आहे. मंगळवारी लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबतच सभापतींच्या खुर्चीकडे पत्रकंही फेकली.

मंगळवारी दिल्ली सेवा विधेयकादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. अशा प्रकारे सभागृहाचे कामकाज चालू शकत नाही. ओम बिर्ला बुधवारी लोकसभेतही गेले नाहीत. विविध राजकीय पक्षांना कडक इशारा देताना ते म्हणाले, तुम्ही सभागृह सुरळीत चालू दिल्याशिवाय मी आत जाणार नाही. खासदारांनी मंगळवारी ज्या प्रकारे गोंधळ घातला त्यामुळे सभापती ओम बिर्ला सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या खासदारांवर संतापले आहेत.