भारतात जात आणि जातीय वक्तव्यांचा मोठा राजकीय बाजार भरत असतो. कारण त्या जातीय वक्तव्याचा राजकीय फायदा मिळत असतो. मुख्य म्हणजे हा राजकीय फायदा मिळवण्याचा सोपा मार्ग असतो.
त्यातही हिंदू आणि हिंदुत्ववादी हे या कथित पुरोगामीत्वाची झुल पांघरलेल्या जातीय लोकांचे खास लक्ष्य असते ! आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक त्यांचे शत्रू ! मग त्यांनी कुठेही केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आणि विवाद उभा केला जातो. यातून त्यांना मिळणारे यश इतकेच की काही काळासाठी हिंदुत्ववाद्यांवर तोंडसुख घेता येते.
या प्रकारचा आता नवीन अध्याय आहे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी वक्तव्य केले आणि त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ घेत कथित पुरोगाम्यांनी वाद तयार केलेला वाद.
नागपुरातील एका पुस्तक प्रकाशन समारंभात सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केलेल्या भाषणाचा वृत्तांत देतांना राज्यातील अग्रणी मराठी वृत्तपत्र म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारे आणि अग्रलेख वापस घेण्याचा पराक्रम आपल्या नावावर जमा असलेले गिरीश कुबेर नावाचे संपादक असणाऱ्या लोकसत्ताने मात्र आपल्या हीन बुद्धीचे प्रदर्शन केले.
या वृत्तपत्राच्या ऑनलाइन एडिशन आणि छापील वृत्तपत्रात त्यांनी या समारंभाचे वृत्त देतांना जे सरसंघचालक बोललेच नाही त्याचा मथळा देत प्रसिद्धी दिली, मथळा होता, “ब्राम्हणांनी पापक्षालन करायला हवे.” मग काय विचारता? राज्यातील समस्त जातीय विद्वेषात जळणाऱ्या आणि हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या पुरोगाम्यांना आयते रान मिळाले. या खोट्या बातमीवर त्यांनी समाज माध्यमांवरती राळ उडवली. अर्थातच विशिष्ठ “जातीय समूहाचे” नाव गुंतल्यामुळे त्या “जातीय समूहातून” ही अनावश्यक टिपण्या समाज माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवर यायला लागल्या. मात्र खरे काय ? याचा अदमासा घ्यायचा प्रयत्न कोणीही केला नाही.
नक्कीच हे मान्य करावे लागेल की संघ आणि सरसंघचालक यांच्या मनात आणि त्यांच्या वक्तव्यात नियमित “राष्ट्र प्रथम” हा भाव असतो. पण त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास कोणताही हिंदुत्ववादी या पद्धतीने करत नाही. सोबतच एक लक्षात घेण्याची गोष्ट अशी की संघात कोणत्याही प्रकारे “जातीय” ओळखला स्थान नाही आणि संघ कधीही कोणाच्याही बाबतीत “जातीय” वक्तव्य करत नाही. मग या बातमी मागील सत्य काय?
तर, नागपुरातील एका पुस्तक प्रदर्शनानिमित्य केलेल्या भाषणात सरसंघचालकांनी “पूर्वजांनी चुका केल्यात आणि त्या मान्य करण्यात कोणताही कमीपणा नाही.” असे वक्तव्य केले होते. अर्थात सरसंघचालकांनी केलेले हेच वक्तव्य खरे कशावरून ? तर तत्सम वृत्त दिले आहे सकाळ वृत्तपत्राने, तसे हे वृत्तपत्र पण हिंदुत्ववादी विचारांचे आणि संघाचे टिकाकार तरी पण या वृत्तपत्राने कोणतीही अतिशोयक्ती न करता या समारंभाचे वृत्त दिले. या समारंभात सरसंघचालकांनी केलेले वक्तव्य असे, ” जातीय व्यवस्थेला आता काही महत्व राहिले नाही. वर्ण, जात या संकल्पना आता सोडून द्यायला हव्या.” ते पुढे म्हणतात की, “सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा एक भाग होता, पण आता तो विसरल्या गेला आहे. मात्र, त्याचे घातक परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या पिढ्यानी सर्वत्र चुका केल्या आहेत आणि भारतही त्याला अपवाद नाही. ” आता या वक्तव्यातील “मागील पिढ्या” कोणत्या तर त्यात अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात मूळ निवासी लोकांचे शीरकाण करणाऱ्या ख्रिश्चनांपासून, तक्षशिला पासून बामीयाम येथील बुद्धमूर्ती तोडणार्या इस्लामी कट्टरपंथीयांपर्यंत सगळेच येत नाहीत काय?
पुढे सरसंघचालक म्हणतात, ” अश्या चुका मान्य करायला हरकत नसावी. प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत. त्यामुळे वर्ण आणि जातीव्यवस्था या भूतकाळातील गोष्टी आहेत आणि त्या विसरायला हव्यात.” आता या संपूर्ण वक्तव्यात सरसंघचालकांनी कुठेही कोणत्याही जातीय समूहाचे नाव घेतल्याचा उल्लेख नाही. मात्र कथित पुरोगामी विचारांच्या लोकसत्ताने मात्र बिनदिक्कत “जातीय” समूहाचे नाव घेत, पुन्हा “पापक्षालन” करणे गरजेचे आहे असे छापून दिले आहे. आता या “पापक्षालन” वरून बाकी पुरोगामी विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न करत गेल्या काही वर्षात त्यांचा हरवलेला “ऑर्गम्स” मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.