नोकरीच्या शोधात आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीच!

धुळे : नोकरीच्या शोधात असलेल्या धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग, व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर (NCS) यांचेमार्फत प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, धुळे येथे 21  रोजी सकाळी 11.00 ते 2.00 दरम्यान प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी) आयोजित करण्यात आला आहे.

यासाठी बेदमुथा इंडस्ट्रीज प्रा. लि. धुळे यांची दहावी/बारावी/आयटीआय उमेदवारांकरीता फिटर, टर्नर, डिझेल मेकॅनिकल अशी एकूण 50 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरिता नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.

धुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेजवरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे.

त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून धुळे जिल्हा निवडून त्यातील placement drive-१ (२०२३-२४) DHULE याची निवड करावी. उद्योजक/ नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा.

किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनीला देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन श्री रा. नि. वाकुडे, सहायक आयुक्त, कौशल्या विकास रोजगार व उद्योजकता, धुळे यांनी केले आहे.