---Advertisement---
धुळे : शहराजवळील नगाव येथे पारंपरिक पद्धतीने लग्न लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊन तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण सुदाम भामरे (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी तसेच बन्सीलाल पाटील आणि आशाबाई पाटील या तिघा कुटुंबीयांना आरोपींनी पारंपरिक पद्धतीने धुमधडाक्यात लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या नावाखाली वेळोवेळी पैसे उकळले गेले.
ही फसवणूक १ मे २०२५ पासून सुरू झाली होती. या काळात तिन्ही कुटुंबीयांकडून एकत्रितपणे ११ लाख रुपयांची वसुली केली गेली. पोलिसांनी नारायण भामरे यांच्या तक्रारीवरून कमलबाई सुधाकर भालेराव, सुनीता गांगुर्डे, अश्विनी, मानव सुधाकर भालेराव, नंदाबाई, किशोर पाटील, पुनम भाईर, रुपाली यादव, मनीषा कुमरे व पठाण भाई, असे देहातावरील १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिरपुरात मजुरावर चाकूने प्राणघातक हल्ला
शिरपूर : शिरपूर फाटा परिसरात मागील भांडणातून एका मजुरावर बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी झाला असून, शिरपूर पोलिस ठाण्यात पाच संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रदीप मनोज भगरे, गणेश सोंद्या भिल, प्रेम प्रवीण कोळी, साहिल सादिक शेख व विशाल वसंत मांग (सर्व रा. मच्छीबाजार टेकभिलाटी, शिरपूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. किशोर नंदलाल सनेर (वय २४, शिरपूर) यांच्या माहितीनुसार, जुन्या वादातून पाच संशयितांनी त्याच्यावर चाकूने वार केले. याप्रकरणी, शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.