आसाम : आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी उधळली. त्यानंतर वाद वाढल्यावर त्यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे.
आसाममधील गोलाघाट जिल्हात एका २५ वर्षीय युवकाने कौटुंबिक वादातून पत्नी आणि तिच्या आई-वडिलांची हत्या केली होती. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. हत्या करणारा पती हा मुस्लिम आणि पत्नी ही हिंदू असल्याने या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे म्हटले होते. त्यावर भाष्य करतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ही मुक्ताफळे उधळली होती.
ते म्हणाले होते की, प्रेम आणि युद्धामध्ये सारं काही माफ असतं. आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. त्यात कृष्णाचं रुक्मिणीसोबत पळून जाणं समाविष्ट आहे. महाभारत घडण्याचं मुळ काय आहे. गांधारीच्या कुटुंबीयांना तिचा धृतराष्ट्रासोबत विवाह करायचा नव्हता. भीष्म पितामहांनी त्यांचा जबरदस्तीने विवाह लावून दिला. मामा शकुनींचा भाऊ तुरुंगात होते. नंतर त्याने कौरवांचा बदला घेतला. तोसुद्धा लव्ह जिहादच आहे, असे विधान त्यांनी केले होते.
बोरा यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच कुणी पोलिसांमध्ये तक्रार केली तर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल, असा इशारा दिला होता. वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे नेते असलेल्या भूपेन बोरा यांनी माफी मागितली.