मुंबई : मंगळवारी मध्यरात्री ४ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जळगाव, अकोला, बुलढाणा, नाशिक, जालना जिल्ह्यात रात्री मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे बळीराजावर पुन्हा अवकाळी संकट कोसळले आहे. अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळाबागांचे मोठं नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे आज मंगळवारी राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली.
राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं असून आज अर्थसंकल्प सादर होत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सकाळीच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधले असून ताततडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. एकामागून एक नैसर्गिक संकट, महागाई आणि सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आधीच शेतकरी खचून गेला आहे. त्यात पुन्हा नव्याने हे संकट. अशा स्थितीत सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
अवकाळीमुळे रात्रीतून झालेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. चाळीसगाव तालुक्यात रात्री आठ वाजता विजेच्या कडकडाटसह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. तर, जालना, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातही पावसाचा जोर दिसून आला. दरम्यान, या गारपिटीमुळे रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारीसह फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक पिकांचे काढणीपूर्वीच अवकाळीमुळे पुन्हा यंदा शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून गेल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे बळीराजाला मदत करण्याची मागणी केली आहे.