नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यात सात ‘मेगा टेक्सटाईल पार्क’ उभारण्याची योजना जाहीर केली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे तब्बल २० लोकांना रोजगार मिळणार आहेत.‘पंतप्रधान मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अॅण्ड अपेरल’ योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेले हे सात प्रकल्प तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये उभारले जाणार आहे.
मोदी सरकारेन ‘पीएम मित्र योजना’ ऑक्टोबर २०२१ मध्ये आणली असून त्याअंतर्गत एकूण ४ हजार, ४४५ कोटी खर्चासह ही योजना कार्यान्वित करण्यात आली. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी प्रारंभिक वाटप २०० कोटी रुपये करण्याची घोषणा केली आहे.१७ मार्च रोजी ट्विटरवरून, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले होते की, “ ‘पंतप्रधान मित्र मेगा टेक्सटाईल पार्क’ वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होईल आणि लाखो नोकर्या निर्माण होतील. हे ’मेक इन इंडिया’ आणि ’मेक फॉर द वर्ल्ड’चे उत्तम उदाहरण असेल,”असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल म्हणाले की, “सरकारने सुमारे २० लाख नोकर्या निर्माण करण्याच्या उद्दिष्टासह जवळपास ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे.देशात वस्त्रोद्योग असंघटित झाला आहे. या वाढलेल्या अपव्यय आणि लॉजिस्टिक खर्चामुळे देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम झाला आहे. त्यासाठीच ही उपाययोजना करण्यात येत आहे.”
देशांतर्गत सात ठिकाणांची निवड करण्याच्या पात्रतेबद्दल बोलताना वस्त्रोद्योग सचिव रचना शाह म्हणाल्या की, “त्यांच्या मंत्रालयाने १३ राज्यांतील १८ प्रस्तावांचा विचार करून पारदर्शक पद्धतीने जागा निवडल्या आहेत. सात ‘टेक्सटाईल पार्क’साठी निवडण्यात येणार्या जागेची पात्रता पारदर्शक पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. यासाठी अनेक घटकांचा विचार केला असून ही योजना येत्या काळात कार्यान्वित केली जाणार आहे.”