नवी दिल्ली : भारतात मशिदीवरील भोंग्यांचा विषय नेहमीच चर्चेत असतो. या विषयावरुन राजकारण देखील जोरात होते. लगेच मुस्लिमांची गळचेपी, धर्मावर आक्रमण, लोकशाही धोक्यात, देशाचे भगवेकरण असे शब्द चर्चेत येतात. मात्र एका मुस्लिम देशानेच नमाजावेळी मशिदीवरील लाऊडस्पीकरला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्या देशाचे नाव आहे, सौदी अरेबिया! सौदी अरेबियात नमाज पठणावेळी लाऊडस्पीकरवर बंदी आणली आहे. रमजान महिन्यासाठी तेथील सरकारने गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.
रमजान महिना २३ मार्चपासून सुरू होणार आहे. रमजानच्या आधी सौदी अरेबिया सरकारच्या इस्लामिक मिनिस्ट्रीने एक गाईडलाईन्स जारी केली आहे. त्यात रमजानवेळी लाऊडस्पीकरमधून नमाज पठण आणि मशिदीत इफ्तार पार्टीवर बंदी आणली आहे. सौदी अरब सरकारने याबाबत १० मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात रमजानवेळी देणगी मागायलाही बंदी घातली आहे. मात्र रमजानमध्ये विविध संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अशा आहेत रमजान महिन्यासाठी सौदीच्या गाईडलाइन्स
नमाज पठणावेळी लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही.
रमजानवेळी देणगी, वर्गणी मागण्यास मनाई
रमजानसाठी दावत मशिदीच्या आत नको. बाहेरच्या परिसरात दावत दिली जाऊ शकते. या दावताचे नियोजन सुपरव्हिजन इमामांच्या हातात असेल.
रमजानच्या पूर्ण महिन्यात मशिदीत इमाम उपस्थित राहतील. अत्यावश्यक असेल तर ते सुट्टी घेऊ शकतात.
इमाम नमाज वेळेवर संपवतील. जेणेकरून दुसर्यांना योग्य वेळ मिळू शकेल.
मशिदीत लहान मुलांना नमाज पठण करण्यावर बंदी
इतीकाफच्या महिन्यात म्हणजेच रमजानमध्ये मशिदीमध्ये जगापासून अलिप्त राहण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल.