---Advertisement---

IPL 2025 : आज लखनौसमोर पंजाब किंग्जचं आव्हान

---Advertisement---

लखनौ : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात आज, मंगळवारी येथे लखनौ सुपर जायण्ट्स आणि फॉर्ममध्ये असलेला पंजाब किंग्ज यांच्यादरम्यान साखळी सामना खेळला जाणार आहे. लखनौ सुपर जायण्ट्सचा नवीन कर्णधार ऋषभ पंत या हंगामात आपल्या घरच्या मैदानावर आपला पहिला विजय नोंदवण्यास उत्सुक आहे.

आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत पहिल्या दोन सामन्यात फलंदाज म्हणून फारशी चमकदार कामगिरी केली नाही. त्यामुळे तो आपल्या २७कोटी रुपयांच्या मोठ्या किमतीचे समर्थन करण्यासाठी कटिबद्ध असेल. लखनौ सुपर जायण्ट्समधील पंतची कर्णधारपदाची सुरुवात दुर्दैवी पराभवाने झाली. लखनौला पंतच्या माजी संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केवळ एका गड्याने पराभव पत्करावा लागला. तथापि, लखनौने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर ५ गड्यांनी विजय मिळवून दमदार पुनरागमन केले. निकोलस पूरन (२३ चेंडूत ७०) व मिशेल मार्श (३१ चेंडूत ५२) व शार्दुल ठाकूर (४-३४) यांच्या शानदार कामगिरीमुळे हैदराबादला मात दिली.

संघाच्या यशानंतरही पंतला सलग दुसऱ्यांदा फलंदाजीमध्ये अपयश आले, पहिल्या दोन सामन्यात तो केवळ ० आणि १५ धावा करू शकला. त्यामुळे आता पंत आपल्या टीकाकारांना शांत करण्यास आणि आपल्या बॅटची चमक दाखवण्यास उत्सुक असेल. पंत पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्सचे माजी प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग यांच्याशी सामना करेल. पॉण्टिंग या हंगामात पंजाब किंग्जमध्ये सहभागी झाले आहेत.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या व दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये हा सामना असेल, यात श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचे नेतृत्व करेल. पंत २७ कोटी रुपयांत लखनौ संघात, तर अय्यर २६.७५ कोटी रुपयांत पंजाब संघात दाखल झाला. अलिकडेच अय्यरने गुजरात टायटन्सविरुद्ध ४२ चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी करून पंजाब किंग्ज संघाला सामना जिंकून दिला.

पंजाबकडून शशांक सिंगने जबरदस्त फटकेबाजी केली, तर प्रियांश आर्यन २३ चेंडूत ४७ धावा करत आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केले. पंजाब किंग्जच्या फलंदाजीच्या प्रयत्नांना गोलंदाजांची उत्तम साथ मिळाली. भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग व मध्यमगती गोलंदाज विजयकुमार वैशाखने डेथवर शिस्तबद्ध गोलंदाजी केली.

एकाना स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांना, विशेषतः फिरकीपटूंना चांगली साथ देते. तथापि, गत हंगामात आयपीएलमध्ये व गत महिन्यात झालेल्या चार वर्ल्ड प्रीमियर लीगमध्ये या खेळपट्टीने वेगवेगळे निकाल दिले. दोन्ही संघांचे फिरकीपटू सामन्याच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. लखनौकडून रवी बिश्नोईवर प्रभावी फिरकी गोलंदाजी करण्याची जबाबदारी असेल, त्याच्यासोबत लेग स्पिनर दिग्वेश राठी असेल. गत वर्षी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये राठीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

यजमान संघाकडे डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमद खेळवण्याचा पर्याय आहे, तर एडन मार्कराम ऑफ स्पिनमध्येही उपयुक्त आहे. अनुभवी भारतीय लेग स्पिनर युजवेंद्र चहल पंजाबच्या फिरकी आक्रमणाचा नेता असेल. ग्लेन मॅक्सवेलही आपल्या कामगिरीवर भर देईल अशी अपेक्षा आहे. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजीचे भरपूर पर्याय आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment