भुसावळ : मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाममध्ये सुरू असलेल्या रुद्राक्ष महोत्सवात भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळातील तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. खंडवा शहरापासून काही अंतरावर महामार्गावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली. मंगल पाटील (42, कृष्ण नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. मंगला हा मध्यप्रदेशातील खाजगी लक्झरीवर क्लीनर म्हणून कार्यरत होता. या घटनेने शहरातील कृष्ण नगरात शोककळा पसरली आहे. शवविच्छेदनानंतर शनिवारी मृतदेहावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रस्ता ओलांडताना वाहनाची धडक
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगल हा भाविकांना कथा श्रवणासाठी सिहोर येथे खाजगी लक्झरीने घेवून गेला होता व परतीच्या प्रवासात खंडवा शहरापासून काही अंतरावरील महामार्गावरील एका हॉटेलवर दुपारी भाविक नास्ता करीत होते व त्याचवेळी हॉटेलमध्ये काही वस्तू राहिल्याने ती घेण्यासाठी मंगला रस्ता ओलांडत असताना लक्झरी वाहनाने त्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवला. या घटनेने शहरातील कृष्ण नगरात शोककळा पसरली. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, मुले, आई, वडील असा परीवार आहे. हातमजुरी करणार्या गरीब कुटुंबावर अपघाताने मोठे संकट कोसळले आहे. शनिवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक किरण कोलते यांनी दिली.